औरंगाबाद- महानगरपालिकेतील राजकारणामुळे मनपात शिवसेना- भाजपची युती असली तरी त्यांच्यात मोठी धुसफूस सध्या सुरू आहे. सध्या शिवसेनेचा महापौर आहे. महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर बस सेवेचा शुभारंभ सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात पार पडला. मात्र क्रांतीचौक येथे आयोजित बस सेवा शुभारंभप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या भाषणानंतर खरपूस समाचार घेत खासदार चंद्रकांत खैरेंचे वाभाडे काढले. महापालिकेत शिवसेनेचाच महापौर असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे टेंडर आत्तापर्यंत का निघाले नाही. असा प्रश्न युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोरच उपस्थित केला. यावर खैरे यांना काहीच बोलता न आल्याने शिवसेनेतील खैरे विरोधी गटाला चांगल्याच उकळ्या फुटल्या.
पर्यावरण मंत्री रामदास कदम हे औरंगबादचे पालकमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधि उपलब्ध करून दिला. तरी तुम्ही टेंडर काढत नाही. त्यातही तुम्ही उशीर करता, हेही सांगा असे म्हणत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी युवासेनाप्रमुख अादित्य ठाकरे यांच्या समोरच खासदार चंद्रकांत खैरे यांचा पानउतारा केला.
काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या निधिमुळे शहरातील विकास कामे होत आहेत॰ मात्र चंद्रकांत खैरे हे सर्व आपणच करत असल्याची बतावणी करतात. खासदार चंद्रकांत खैरे हे कोणतीही माहिती न घेता ऐकलेल्या माहितीवरून उलट सुलट बोलत राहतात. खैरे साहेब तुम्ही खासदार होतात, मंत्री होतात मात्र राजबाजार मध्ये जाऊन तुम्ही माझ्यावर आरोप केलेत. गणपती बाप्पा ने तुम्हाला कशी सूद्बुद्धी दिली ते मला नाही माहीत मात्र तुम्ही व्यापार्यांना जाऊन संगितले की मार्केट कमिटीची जादा भावाने प्लॉट विकला आणि त्यातून मिळालेला पैशांचा हिस्सा हरिभाऊ बागडेना दिला. ही माहिती जर खरी असेल तर तुम्ही निश्चित कोर्टात जा, मी तुम्हाला परवानगी देतो. सत्याचे सत्य झाले पाहिजे. अशा एकीव माहितीवरून आमचा एखादा नवीन निवडून आलेला एकही नगरसेवक सुद्धा बोलत नाही असे तुम्ही बोलता. तुम्ही आजही नगरसेवकच्या भूमिकेत आहात. तुम्ही जरा खासदारच्या भूमिकेत या, खैरे जरा खासदारासारखे वागा, वीस वर्ष झाले तुम्ही खासदार आहात. फुलंब्री येथील भाषणात तुम्ही म्हणाले की हरिभाऊ बागडे कन्नड,वैजापुरला हिंडतात जॅकेट घालून. लोकांनी बोलावले तर आपल्याला जावे लागते खैरे साहेब तुम्ही जो आक्षेप घेतला तो तसाच ठेवा. तो जरूर पुढे न्या तसा बिलकुल सोडू नका.